नियमांना बगल देत मोजणीचा डाव,भूमिअभिलक कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराला आवर कोण घालणार !  गट क्र. ५५ प्रकरणी भवर अधीक्षकांविरोधात जिल्हास्तरावर थेट तक्रार 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव :—

 

महागाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भवर अधीक्षकांनी शासकीय नियम व कायद्याच्या तरतुदी धाब्यावर बसवत गट क्रमांक ५५ ची स्वतंत्र मोजणी व हद्द कायम करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप गटधारक जयंत भाऊराव चौधरी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी उपसंचालक, भूमी अभिलेख विभाग,यवतमाळ जिल्हा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार गट क्रमांक ५५, ५६, ५७ व ५८ हे एकत्रित गट असून, कायद्यानुसार त्यांची मोजणी व हद्द कायम प्रक्रिया एकत्रितपणेच करणे बंधनकारक आहे. या सर्व गटांची मोजणी यापूर्वीच सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने पूर्ण झाली असून, त्याबाबतची मोजणी शीट उपलब्ध असताना देखील केवळ गट क्र. ५५ ची स्वतंत्र मोजणी करण्याचा नियमबाह्य बेत आखल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रक्रियेसाठी सर्व संबंधित गटधारकांना कायद्यानुसार नोटीस देणे आवश्यक असताना, निवडक व्यक्तींनाच नोटीस देऊन परस्पर मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. गैरप्रकार उघडकीस येताच संबंधित मोजणी प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली असली, तरी बोगस व दिशाभूल करणारी कागदपत्रे दाखवून पुन्हा स्वतंत्र मोजणीचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी ठाम मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीची प्रत चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनाही तहसीलदार, महागाव यांच्यामार्फत पाठविण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे महागाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

——————————————————————————-

⬛ आम्ही नियमानुसारच काम करत आहेत.. भवर

 

वरील विषया संदर्भात अधीक्षक भवर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी आम्ही आमच्या कार्यात नियमानुसारच काम करीत असतो.आम्ही आमच्या कामात अनियमितता केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास वरिष्ठांच्या कार्यवाही सामोरे जाण्यास पात्र असेल.असे भवर यांनी लोकप्रिय लोकवेध न्यूज पोर्टलशी बोलतांना स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या