उमरखेड आगारात ३१ डिसेंबरला ‘प्रवाशी राजा दिन’; तक्रारींचे होणार जागेवरच निवारण

 

लोकवेध न्युज नेटवर्क 

उमरखेड :-  

 

आगारातील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि एसटी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आगामी ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमरखेड आगारामध्ये ‘प्रवाशी राजा दिन’ (प्रवासी तक्रार निवारण दिन) आयोजित करण्यात आला आहे. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण विभागात राबविला जात आहे. उमरखेड येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला यवतमाळचे विभाग नियंत्रक कछवे स्वतः उपस्थित राहणार असून प्रवाशांच्या थेट तक्रारी जाणून घेणार आहेत.

प्रामुख्याने वेळेवर बसेस रद्द होण्याच्या तक्रार, बस फेऱ्यांचे विस्कळीत झालेले नियोजन, 

प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा अभाव, 

कर्मचारी आणि प्रवासी यांच्यातील समन्वयाचे प्रश्न यावर चर्चा होणार आहे.

उमरखेड आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत पार पडणार आहे. या काळात प्रवाशांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्ष मांडण्यासाठी उपस्थित राहावे.

“प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन उमरखेड आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या