माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन; हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

⚫लोकवेध न्युज नेटवर्क 

 

वणी :- 

 

 वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन झाले असून मंगळवार, २२ डिसेंबर रोजी त्यांच्या मूळ गाव पठारपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत दिवंगत नांदेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

मुंबई येथील लीलावती रुग्णालय येथे उपचार सुरू असताना २१ डिसेंबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबईहून अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे वणी येथे आणण्यात आले. मंगळवारी सकाळी ९:३० वाजता सजविलेल्या वाहनातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पार्थिव पठारपूरकडे नेण्यात आले. या दरम्यान टिळक चौक, गणेशपूर, पेटूर, नवरगाव, वडजापूर, कायर आदी गावांतील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

पठारपूर येथील राहत्या घरी अंतिम विधी पूर्ण झाल्यानंतर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत नांदेकर यांना त्यांचे पुतणे विशाल नांदेकर यांनी मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुदर्शन निमकर, मनसे नेते राजू उंबरकर, शिवसेना (शिंदे) गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया, काँग्रेस नेते संजय खाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धासुमने अर्पण केली.

अंत्यसंस्कारावेळी मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. शासकीय प्रतिनिधी म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले व तहसीलदार निखिल धूळधर उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावरील जनसमुदाय लक्षात घेता पोलिस व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. येणाऱ्या वाहनांसाठी पठारपूर गावालगत शेतात विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

दिवंगत विश्वास नांदेकर यांच्या निधनाने वणी विधानसभा मतदारसंघातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या