पत्नीच्या विजयासाठी नितीन भुतडांची ‘अभिमन्यू’सारखी झुंज अपुरी ठरली उमरखेड नगरपरिषदेवर जनशक्तीचा ताबा; तेजश्री जैन नगराध्यक्ष

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :

 

उमरखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे समन्वयक नितीन भुतडा यांनी आपल्या पत्नी व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निधी भुतडा यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. मात्र ही लढाई महाभारतातील अभिमन्यूसारखी ठरली आणि अखेरीस जनशक्ती पॅनलने बाजी मारली.नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत जनशक्ती पॅनलच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांनी निधी भुतडा यांचा ९८४ मतांनी पराभव केला. तेजश्री जैन यांना ११,१०३ मते मिळाली, तर निधी भुतडा यांना १०,११९ मते मिळाली.

 

नगरसेवक पदासाठी शहरातील १३ प्रभागांमधून २६ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.या निवडणुकीत जनशक्ती पॅनलचे १७ तर भाजपाचे ९ उमेदवार विजयी झाले. या निकालानंतर उमरखेड नगरपरिषद जनशक्ती पॅनलच्या ताब्यात गेली असून लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेध न्यूजचे भाकीत अगदी अचूक ठरल्याने केलेल्या वृत्त विश्लेषणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लोकवेध न्यूज पोर्टलने निवडणूकपूर्व भाकीतात जनशक्ती पॅनलला स्पष्ट बहुमत मिळेल,असे नमूद केले होते.आज जाहीर झालेल्या अधिकृत निकालातून हे भाकीत खरे ठरले आहे.

 

उमरखेड नगरपरिषदेची निवडणूक तब्बल ९ वर्षांनंतर पार पडली. २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली.प्रभाग क्रमांक १ मध्ये ईश्वरचिठ्ठी प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाचे सुरेंद्र कोडगिरवार व जनशक्ती पॅनलचे संदीप ठाकरे यांना समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपाचे सुरेंद्र कोडगिरवार विजयी ठरले.याच प्रभागातील दुसऱ्या जागेवर ज्योत्स्ना प्रतिक रुडे निवडून आल्या.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सखाराम मुळे,तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. अजय कुरवाडे यांनी अत्यंत पारदर्शकपणे काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या