२४ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती : ‘लोकवेध’चे भाकीत ठरले खरे; उमरखेडमध्ये ‘बस’वर जनशक्तीचा दणदणीत विजय!


⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत तब्बल २४ वर्षांनंतर मोठे राजकीय परिवर्तन घडले असून, ‘लोकवेध’ने वर्तवलेले भाकीत अखेर खरे ठरले आहे. जनशक्ती पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले असून, ‘बस’ या निवडणूक चिन्हाने पुन्हा एकदा उमरखेडच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती घडवली आहे.
आज नगरपरिषद मंगल कार्यालयात झालेल्या मतमोजणीत जनशक्ती पॅनेलने निर्णायक आघाडी घेत सत्ता काबीज केली. या निवडणुकीत जनशक्ती पॅनेलचे सतरा अधिक एक नगराध्यक्ष असे अठरा उमेदवार निवडून आले असून भारतीय जनता पक्षचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत,एकूण निकालाने सत्तासमीकरणे पूर्णतः बदलून टाकली आहेत. २४ वर्षांपूर्वी बस चिन्हावर अपक्षांची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच चिन्हाने परिवर्तनाची नांदी दिल्याने शहरात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
जनशक्ती पॅनेलला बस चिन्ह मिळाल्यानंतरच निवडणुकीची हवा बदलली होती. मतदारांमधील असंतोष, विकासकामांतील दिरंगाई, घनकचरा व्यवस्थापनातील वादग्रस्त प्रकरणे आणि नव्या नेतृत्वाची अपेक्षा — या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला.
नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या सौ. तेजश्री जैन यांच्या नेतृत्वाला मिळालेला प्रतिसाद, संघटनशक्ती आणि ‘बस’ चिन्हाशी जोडलेली ऐतिहासिक आठवण या विजयामागील प्रमुख कारणे ठरली आहेत, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
दरम्यान, निकाल जाहीर होताच उमरखेड नगरीत विजयी मिरवणूक मोठ्या जल्लोषात निघाली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि आनंदोत्सवात परिवर्तनाचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
एकूणच, उमरखेड नगरपरिषद निवडणूक ही केवळ सत्ता बदलाची नाही, तर २४ वर्षांनंतर जनतेने दिलेल्या ठाम निर्णयाची आणि इतिहासाच्या पुनरावृत्तीची नोंद ठरली आहे.
