उमरखेड न.प. सत्तेचा कौल उद्या ; आठ फेऱ्यांत मतमोजणी,राजकीय भवितव्य पणाला

 

लोकवेध न्यूज नेटवर्क | २० डिसेंबर

उमरखेड :- 

उमरखेड नगरपरिषदेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार,याचा अंतिम फैसला उद्या रविवारी होणार आहे. २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीचा निकाल Election Commission of Indiaच्या निर्णयामुळे रखडला होता. अखेर उद्या रविवारी नगरपरिषद मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू होत असून, १३ प्रभागांतील १२७ नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या ५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

 

प्रशासनाने मतमोजणीसाठी पूर्ण ताकद लावली असून, १२० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, ७ टेबलांवर ही प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण मतमोजणी ८ फेऱ्यांत पूर्ण करून निकाल जाहीर केला जाणार आहे.प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५ व ७ यांची मतमोजणी ३ फेऱ्यांत, तर प्रभाग क्रमांक ६ ची मतमोजणी ४ फेऱ्यांत होणार आहे. पहिल्या चार फेऱ्यांत सात प्रभागांचे निकाल समोर येणार आहेत. त्यानंतर पाचवी ते आठवी फेरीदरम्यान प्रभाग क्रमांक ८, ९ व १२ यांची मतमोजणी तीन फेऱ्यांत, तर प्रभाग क्रमांक १०, ११ व १३ यांची मतमोजणी चार फेऱ्यांत होणार आहे. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

प्रत्येक टेबलवर प्री-गणना पथकातील ३ ते ४ कर्मचारी कार्यरत असून, आकडेवारी थेट संगणक व ऑनलाइन प्रणालीद्वारे तपासली जाणार आहे. कोणतीही चूक राहू नये म्हणून स्वतंत्र पथकांकडून आकडे पडताळले जात असून, अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर केला जाणार आहे.मतमोजणीच्या तोंडावर उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षांची धाकधूक कमालीची वाढली आहे. बहुरंगी लढतीनंतर आता सत्तेसाठी दुरंगी संघर्ष उघड झाला असून, विकासाच्या नावावर मते कुणाच्या बाजूने झुकली, की जनतेने विद्यमान समीकरणांना धक्का दिला,याचे उत्तर उद्याच मतपेटीतून बाहेर येणार आहे.उमरखेडच्या राजकारणाला नवा चेहरा मिळणार की ? जुनीच सत्ता पुन्हा प्रस्थापित होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा; वाहतूक पूर्णतः नियंत्रित संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मतमोजणीस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. १२ पोलीस अधिकारी, ८५ पोलीस कर्मचारी, १ आरसीपी पथक, १ बीएसआरपीएफ पथक आणि ३० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरही कडक वाहतूक नियंत्रण लागू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या