महागावच्या सहकार राजकारणात नवे पर्व, विशाल पवार यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड ;सर्व संचालकांच्या विश्वासाचे फलित

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव : –
महागाव तालुका खरेदी-विक्री शेतकी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विशाल पवार यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संचालकपदी निवड झाल्याने महागाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सहकार आणि राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निवड म्हणजे महागाव तालुक्याच्या सहकार राजकारणाला मिळालेले बळ असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.महागाव तालुका खरेदी-विक्री शेतकी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देत विशाल पवार यांनी गेल्या काही वर्षांत प्रभावी नेतृत्व उभे केले आहे. शेतमालाला योग्य दर, खते-बियाण्यांचा वेळेवर पुरवठा, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत आणि संस्थेतील पारदर्शक कारभार यामुळे त्यांनी सभासदांचा विश्वास संपादन केला. याच विश्वासातून आणि सर्व संचालकांच्या एकमतातून त्यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्यांना आर्थिक आधार देणाऱ्या या संस्थेच्या संचालक मंडळावर विशाल पवार यांचा समावेश होणे,ही महागाव तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड ठरत आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सहकारी संस्था आणि जिल्हा बँक यांच्यात समन्वय अधिक मजबूत होईल, तसेच विकासाभिमुख निर्णयांना चालना मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या निवडीनंतर सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी विशाल पवार यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या कार्यालयात जल्लोषाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना विशाल पवार म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी संधी दिल्याबद्दल सर्व संचालक, सभासद आणि सहकारी बांधवांचे मनापासून आभार.शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, तसेच बँकेचा कारभार अधिक पारदर्शक व लोकाभिमुख ठेवणे, हाच माझा संकल्प असल्याचे ते म्हणाले.विशाल पवार यांच्या या निवडीमुळे सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील,शेतकऱ्यांचे हित अधिक प्रभावीपणे जपले जाईल आणि जिल्हा बँकेच्या निर्णयप्रक्रियेत महागाव तालुक्याचा प्रभाव वाढेल, अशी भावना राजकीय व सहकारी वर्तुळात व्यक्त होत आहे.
