राज्य सरकारवर आर्थिक बोजा न पडणारी गुणवंत कामगारांची एस.टी. सवलत तातडीने लागू करा ;आमदार सतेज पाटील

⚫लोकवेध न्युज नेटवर्क
नागपूर :
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या गुणवंत कामगारांना इतर पुरस्कार्थींप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बस प्रवासात सवलत देण्यात यावी, अशी ठाम मागणी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी चालू हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली.
या सवलतीमुळे राज्य सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसून, सवलतीसाठी लागणारा संपूर्ण खर्च कामगार कल्याण मंडळ उचलणार आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील आमदार, खासदार व नामदार अशा ७० हून अधिक लोकप्रतिनिधींनी या मागणीसाठी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे शिफारसी केल्या आहेत. तसेच, राज्यभरातील प्रसारमाध्यमांतूनही या मागणीला सातत्याने पाठिंबा मिळत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, गुणवंत कामगारांना बस प्रवासात सवलत देण्यासाठी कामगार विभाग तयार असून, प्रधान सचिव (कामगार) यांनी अंतिम मंजुरीसाठी योजना स्वरूप प्रस्ताव कामगार मंत्र्यांकडे सादर केला आहे. कामगार मंडळाकडे नाविन्यपूर्ण योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्याने, शासनाने या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
दरम्यान, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व उपाध्यक्ष केरबा डावरे यांनी सांगितले की, प्रधान सचिवांनी पाठविलेला प्रस्ताव कामगार मंत्र्यांनी मान्य करून समाजाभिमुख सेवेत कार्यरत गुणवंत कामगारांना न्याय द्यावा.
यावेळी संजय सासने, प्रभाकर कांबळे, अनिता काळे, दिलीप साटम, दत्तात्रय शिरोडकर, संपतराव तावरे, संभाजी थोरात, देवराव कोंडेकर, भरत सकपाळ, अशोक जाधव, शिवाजी चौगुले, भगवान माने, महादेव चक्के, वसंत डावरे, रघुनाथ मुधाळे, विजय आरेकर, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, प्रविण भिके, संजय गुरव, नरेंद्र रहाटे, संतराम जाधव, संजय चव्हाण आदी सहकारी उपस्थित होते.
