महागाव बाजार समितीचा सत्ताकौल २६ डिसेंबरला ; सभापती गुलाबराव जाधवांविरोधातील अविश्वास ठरावावर निर्णायक मतदान
⚫लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव : –
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर दिनांक २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या एका मतदानाकडे केंद्रित झाले आहे.समितीतील १८ पैकी तब्बल १४ संचालकांनी एकत्र येत हा अविश्वास प्रस्ताव दिनांक १५ डिसेंबर रोजी अधिकृतरीत्या दाखल केला. या प्रक्रियेसाठी सर्व संचालक थेट,जिल्हाअधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयात यवतमाळ येथे उपस्थित राहिले. हे,या सत्तासंघर्षाचे गांभीर्य अधोरेखित करणारे ठरले.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३(अ) अन्वये सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावात सभापतींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. संचालकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेणे, बाजार समितीच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांना लाभदायक ठरणारे निर्णय राबविणे, मासिक सभेत चर्चा न करता परस्पर आदेश काढणे, तसेच बहुमताने मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे,अशा ठळक बाबी प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत.
या ,पार्श्वभूमीवर संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सर्वसाधारण सभा बोलावून अविश्वास ठरावावर तातडीने निर्णय घेण्याची ठाम मागणी केली होती. त्यानुसार आता २६ डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते, महागाव बाजार समितीच्या सत्तेचा कौlल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले होणारे मतदान गुप्तपणे होते की ? उघडपणे घेतल्या जाईल हे मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
