वादग्रस्त देशी दारू दुकान पुर्वीच्याच जागी सुरू होण्याचे संकेत,नगरपंचायतीची संशयास्पद भूमिका पुन्हा चर्चेत !

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव: शहरातील प्रभाग क्र.१ मधील बेलपत्रे कॉम्प्लेक्स येथे प्रस्तावित वादग्रस्त देशी दारू दुकान सुरू होण्याचे संकेत पुन्हा एकदा मिळत आहेत. दुकान मालक शुभम बाबुलाल जयस्वाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने प्रशासनाने ६ आठवड्यात निर्णय घ्यावा असा आदेश दिल्याने आता हे दुकान पुर्वीच्याच जागी उभे राहणार हे स्पष्ट दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
दरम्यान, नगरपंचायत आणि सत्ताधारी गटाची संशयास्पद भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कचऱ्याचा प्रश्न महिनोंपर्यंत सोडविण्यात अकार्यक्षम दिसणाऱ्या प्रशासनाने मात्र दारू दुकानाला एनओसी तत्काळ दिली, एवढेच नव्हे तर जावक रजिस्टरवर हा निर्णय इंग्रजी भाषेत अत्यंत गोपनीयतेत नोंदविण्यात आल्याचा आरोप नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांनी केला आहे.
दारू दुकानाला विरोध करणाऱ्या काही झारीतील शुक्राचार्यांनी आतून मलिदा खाऊन गुप्त पाठबळ दिलं असून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी उपोषणाची नौटंकी रंगवल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.एनओसी देण्यात आली,नंतर उघडकीस आली, मोठी राजकीय उलथापालथ झाली,त्यानंतर उपोषण, घोषणा आणि निर्णय रद्द, पण आज पुन्हा न्यायालयाकडून आदेश येताच या खेळीमागे कोणाचा मेंदू, कोणाचा फायदा आणि कोणाचा हात ? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
———————————————————————
एकच शब्द – Business आणि पानात लपवलेली एनओसी जावक रजिस्टरमध्ये अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा विषय मराठीत पण देशी दारू दुकानाचा निर्णय मात्र इंग्रजीतील एक ओळ
देशी दारू दुकान असा उल्लेख टाळला Business purpose असा शब्द वापरून दिशाभूल करण्यात आली.संबंधित पान इतर पानांमध्ये पिन मारून लपवले यातून एनओसी गुप्त ठेवण्याची पद्धतशीर खेळी झाली असल्याचा सुद्धा गंभीर आरोप होत आहे.
⬛ दारू दुकानाला विरोध करू ; शैलेश कोपरकर
गटनेते शैलेश कोपरकर यांनी स्पष्ट भूमिका घेत या निर्णयाविरोधात आम्ही पुन्हा कोर्टात जाणार, महागावात नवे देशी दारू दुकान कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिला असला तरी शैलेश कोपराच्या कोपरखेळीची महागाव करांना चांगलीच जाण आहे.या संदर्भात येणाऱ्या काळात याच विषयावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
