अपघाताला आमंत्रण! आर्णीतील अरुणावती नदी पुलावरील तुटलेले कठडे तातडीने बसवण्याची मागणी

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

आर्णी : 

 

शहरालगत असलेल्या अरुणावती नदीवरील जुना पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून पुलावरील संरक्षण कठडे तुटल्यामुळे कुठल्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, पुलावर तातडीने संरक्षण कठडे बसवावेत, अशी ठाम मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे पश्चिम विदर्भ समन्वयक प्रमोद कुदळे यांनी केली आहे.

 

या संदर्भात कुदळे यांनी कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत निवेदन सादर केले आहे. निवेदनात तालुक्यातील मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची थकित देयके शेतकऱ्यांना तात्काळ देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

 

अरुणावती नदीच्या काठावर पुरातन महादेव मंदिर तसेच बाबा कंबलपोश यांचा दर्गा असून हा पूल उमरखेड, नांदेड व दिग्रसकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक व शेतकरी दररोज या पुलावरून प्रवास करतात. कठडे तुटलेले असतानाही वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

 

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात येथे उरूस शरीफ भरत असून हजारो भाविक येथे येतात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन पुलावरील तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करावेत तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी स्पष्ट मागणी कुदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या