महागावच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासन-ठेकेदार मिलीभगतीचा आरोप गुंज,सवना,महागाव मार्ग खड्ड्यांनी छिन्नविछिन्न; नागरिक संतापाच्या टोकावर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. तालुक्यातील प्रमुख मार्गांवर खोल खड्ड्यांचे जाळे तयार झाल्याने प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. विशेषत: गुंज–सवना–महागाव हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.दररोज या रस्त्याचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास तासन्तास लांबतो, धुळीचा त्रास वाढतो आणि गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पालकांमध्येही सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, उस वाहतुकीसाठी दररोज शेकडो ट्रॅक्टर–ट्रॉली या मार्गावरून जात असताना वाहने खड्ड्यांत अडकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प राहते आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वेळेवर पोहोचत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये
करंजखेड,महागाव,सवना,वाकोडी,काळी,टेंभी,वरोडी, पिंपरी,गुंज,माळेगाव,खडका,पेढी,पोखरी, महागाव,आमणी या प्रमुख रस्त्यांवरून जाणारे वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
नागरिकांच्या तक्रारी, निवेदने आणि मागण्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी विशाल पवार, गणेश भवानकर, प्रमोद जाधव, शंकर भवानकर, रविकांत भोपळे, संतोष राऊत, गजानन नवाडे यांनी लेखी निवेदन दिले असतानाही कार्यवाही शून्य राहिल्याची खंत व्यक्त होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत, प्रत्यक्षात रस्त्यांचा प्रश्न कायम ठेवला जात आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे सुरू न झाल्यास मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
