नोकरी लावून देण्याच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नोकरी लावून देण्याच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वाशिम जिल्ह्यातील तीन जणांनी संगनमत करून किनवट तालुक्यातील एका ३१ वर्षीय युवकाची तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उमरखेडात घडली आहे. या प्रकरणी पीडित युवकाने १५ नोव्हेंबर रोजी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तिघा आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रमेश इंद्रजित पडवाल (३१, रा. नागेशवाडी, ता. किनवट, जि. नांदेड) यांना नोकरी लावून देतो असे सांगून आरोपी रमेश नवघरे (४८), सुरेश गजभार (४८) आणि सचिन शेजर (४५), सर्व रा. आसरा, जि. वाशिम यांनी १५ नोव्हेंबर रोजी उमरखेड शहरातील ग्रीन पार्क कॉलनी येथे बोलावून घेतले. तेथे पडवाल यांच्याकडून १५ लाख रुपये रोख तसेच बँकेतून १४ लाख रुपये काढून एकूण २९ लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेताच तिघेही आरोपी पसार झाले.
फसवणूक झाल्याची जाणीव होताच रमेश पडवाल यांनी तत्काळ पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानुसार ठाणेदार शंकर पांचाळ यांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून स.पो.नि. योगेश जाधव पुढील तपास करीत आहेत.
