नदीवरील पुलाचे बांधकाम रेंगाळले निवडणूक तोंडावर असताना पीडब्लूडी उपअभियंत्यांची झोप मौजेत !

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
पुसद शहरात नगरपरिषद निवडणूक जोरात सुरू आहे पण शहराच्या विकासकामांची स्थिती मात्र प्रश्न निर्माण करणारी. पुसद नागपूर मार्गावरील पूस नदीवरील महत्त्वपूर्ण पुलाचे बांधकाम कासवासारखे रेंगाळत आहे. निवडणुकीत विकासावर मोठी मोठी भाषणे देणारे नेतागण आणि अधिकारी वर्ग याबाबत तोंडात बोट घालून शांत बसलेले दिसतात.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयापासून फक्त हाकेच्या अंतरावर सुरू असूनही, तपासणी, देखरेख, नियमपालन या सर्व बाबतीत विभागाने हात झटकले असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. रेंगाळत असलेल्या कामाला गतिमान करून पुलाचे दर्जेदार बांधकाम व्हावे अशी जनभावना आहे.
———————————————————
कंत्राटदाराची मनमानी कुणाच्या छत्रछायेत ? हा जनतेचा प्रश्न
शासनाच्या अटी व शर्तींना तिलांजली देत बांधकाम सुरू आहे.दर्जाहीन साहित्याचा वापर, नियमभंग, तपासणीचा अभाव यामुळे कंत्राटदार कोणत्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाखाली काम करतोय ?असा उघड प्रश्न नागरिक सरळ विचारत आहेत.सर्वात गंभीर म्हणजे कामाचे तपशील सांगणारा फलकच लावलेला नाही !
कामासाठी मिळालेला शासननिधी किती? कंत्राटदार कोण ? मुदत किती ? हे सर्वच अंधारात ठेवले गेले आहे.निवडणुकीच्या तोंडावर अशी अदृश्य पारदर्शकता’ नागरिकांना पुरते हादरवणारी आहे.
———————————————————
पीडब्ल्यूडी उपअभियंत्यांची भूमिका संशयास्पद कंत्राटदाराशी अर्थसंबंध?
लोकांमध्ये जोरदार चर्चा उपअभियंता जनतेचे आहेत की कंत्राटदाराचे ?
नियमाप्रमाणे फलक लावणे अनिवार्य असताना, कंत्राटदाराला तशी नोटीस देण्याचे धाडस उपअभियंत्यांमध्ये नाही.निवडणुकीचा काळ असूनही विभागाकडून अजिबात तत्परता नाही.
⚫ नागरिकांचं परखड मत ⚫
अधिकाऱ्यांचे नाते जनतेशी की कंत्राटदाराशी ? निवडणुकीनंतर याची किंमत मोजावी लागेल !
——————————————————-
वाहतूक विस्कळीत,अपघातांचा धोका पण सत्ताधारी गप्प !
एका बाजूला नवीन पुलाचे काम थांबलेले,
तर दुसऱ्या बाजूला जुन्या पुलावर वाहनांची प्रचंड कोंडी.
शाळकरी मुली, महिला, जेष्ठ नागरिक यांना दररोज जीव धोक्यात घालून पुलावरून पायदळ जावे लागत आहे.अपघात कधीही घडू शकतो पण अधिकाऱ्यांचे आडवे तिडवे पाहणे सुरूच आहे.शहरात निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना,जनतेच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार? कुठला नेता, कुठले पदाधिकारी याबाबत आवाज उठवणार ? हा प्रश्न जास्त गंभीर बनत चालला आहे.
⬛ निवडणुकीत ‘विकास’ हा मुद्दा
मग या पुलाचे काम कोणी मुद्दाम रेंगाळवत आहे ?
नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून चर्चा रंगात येत आहे.
निवडणूक सुरू आहे म्हणूनच पुलाचे काम संथ ठेवून काहीजण राजकीय गणित मांडत आहेत का ?
कंत्राटदार अधिकारी राजकीय नेते यांचे जुळलेले हितसंबंध असल्यानेच काम अडवून ठेवले आहे का ? यामुळे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना तसेच विरोधकांना नागरिकांनी थेट सवाल केला आहे.शहराचा विकास हा मुद्दा निवडणुकीच्या भाषणापुरता आहे का ? असेन अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
———————————————————
जनतेचा थेट सवाल
काम जलदगतीने पूर्ण करा, पारदर्शकता आणा !
नवीन पूल हा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, नागरिकांचे हाल
हे सर्व तातडीने थांबावे यासाठी जनतेची ठाम मागणी असून कामाचा तपशील असलेला फलक तात्काळ लावावा,दर्जेदार साहित्य वापरल्याची कडक तपासणी व्हावी,काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत,अधिकारी कंत्राटदार हितसंबंधांची चौकशी व्हावी,
———————————————————
नागरिकांचे सरळ आणि परखड विधान
पूल निवडणुकीपुरता मुद्दा नाही;
तो आमच्या जीवाशी संबंधित प्रश्न आहे.
आमच्या मतांचा निर्णय यावरच होईल!
________________________________________________
वरील विषया संदर्भात संबंधित उपअभियनता उमाकांत कांबळे यांची प्रतिक्रिया घेण्याच्या प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
