माउंट लिटर झी स्कूल, महागाव येथे विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद.  

 

 

लोकवेध न्यूज नेटवर्क

 

माउंट लिटर झी स्कूल, महागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनीला विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नर्सरी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीत सहभाग नोंदवला असून, जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी स्वतःची वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, तसेच नवकल्पनात्मक प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व उत्सुकतेला वाव मिळावा, तसेच विज्ञान विषयाविषयी त्यांच्यातील कुतूहल वाढावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

 

प्रदर्शनीत वातावरण, ऊर्जा, पाणी संवर्धन, अवकाश विज्ञान, रोबोटिक्स, पर्यावरण संरक्षण, वाहतूक व्यवस्था, तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे अनुप्रयोग अशा विविध विषयांवरील मॉडेल्स पाहावयास मिळाली. लहानग्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली मॉडेल्स पाहून उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली. विशेषतः नर्सरी व केजी वर्गातील मुलांनी रंगीत, आकर्षक व कल्पकतेने सजविलेली मॉडेल्स सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन दाते कॉलेज यवतमाळ चे प्राचार्य डॉ.श्री राजेश सिंगरू, श्री विठ्ठल रुक्मिणी कला वाणिज्य महाविद्यालया,सवनाच्या प्राध्यापिका डॉ. स्वाती थातोट आणि माउंट लिटर झी स्कूलचे अकॅडमिक हेड डॉ.भूषण सर उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, बालपणीच विज्ञानाची गोडी लागली तर त्यातून उद्याचे महान शास्त्रज्ञ घडू शकतात, असे मत व्यक्त केले. शाळेतील शिक्षकवर्ग तसेच पालकांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्साहाने योगदान दिले.

 

संपूर्ण परिसरात वैज्ञानिक वातावरण निर्माण करणारी ही प्रदर्शनी शाळेच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाची पायरी असल्याचे सर्वांनी नमूद केले. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि ज्ञान यांचे उत्तम सादरीकरण पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. माउंट लिटर झी स्कूल, महागाव यांनी पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले.ही विज्ञान प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून, ‘विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील विषय नसून जीवनाचा पाया आहे’ याची जाणीव तिला लाभलेल्या प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या