आधार सेवा केंद्रावर सकाळपासूनच महिला भगिनींच्या रांगा; ई-केवायसीने उडवली झोप

 

 

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव :-

महागाव शहरातील आधार सेवा केंद्रासमोर सोमवारी सकाळपासूनच प्रचंड गर्दीची परिस्थिती पाहायला मिळाली. विशेषतः महिला भगिनींच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. केंद्राच्या बाहेर पहाटेपासूनच महिलांनी स्थानिक योजनांसाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी महागाव तहसीलच्या प्रशाकीय इमारतीत असलेल्या आधार सेवा केंद्रावर मोठ्याप्रमाणात रांगा लागल्या असून रांगेत आपला नंबर असावा या साठी काहींनी आपल्या चपला ठेवल्याचे निदर्शनास आले.

 

सरकारच्या नव्या नियमांनुसार अनेक योजनांसाठी ई-केवायसी अनिवार्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अक्षरशः ओझे कोसळले आहे. अनेक घरांतील स्त्रियांना रोजच्या घरकामातून वेळ काढून आधार केंद्रावर तासन्तास थांबावे लागत असून, त्यातून निर्माण झालेल्या त्रासामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

रांग व्यवस्थापनाचा अभाव, कमी काउंटर, अपुरी तांत्रिक सुविधा आणि दिरंगाईमुळे ई-केवायसी प्रक्रिया आणखी धीमी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दरवेळी नवे नियम, पण सुविधा मात्र शून्य ! सर्वसामान्यांना योजनांच्या नावाखाली रांगेत उभे राहण्याशिवाय पर्यायच ठेवला नाही असा संताप अनेक महिलांनी व्यक्त केला.दरम्यान, गर्दी व अव्यवस्थेमुळे गोंधळ वाढत असून प्रशासनाने त्वरित अतिरिक्त काउंटर सुरू करावेत, रांग व्यवस्थापन सुधारावे आणि ई-केवायसी साठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जनभावना आहे.

 

सरकारच्या निर्णयामुळे सामान्यांच्या झोपेचे खोबरे झाले असून, आधार सेवा केंद्रांवरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या