अंधश्रद्धा निर्मूलन समितीची महागाव तालुक्यात बैठक : वैज्ञानिक विचार जागृतीसाठी पुढील महिन्यात मोठे उपक्रम

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महागाव तालुका शाखेची महत्वाची बैठक आज मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समितीच्या आगामी उपक्रमांना दिशा देणारी ही बैठक कार्याध्यक्ष गजानन वाघमारे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस अंनिस यवतमाळ शाखेचे जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद सीडम आणि जिल्हा कार्यवाह विनय मिरासे अशांत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. वैज्ञानिक दृष्टीकोन, सामाजिक बांधिलकी आणि अंधश्रद्धाविरोधी लढ्याची आजच्या काळातील आवश्यकता यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला.

बैठकीचे अध्यक्षस्थान समितीच्या अध्यक्षा जयश्रीताई नरवाडे यांनी भूषविले. समितीचे उपाध्यक्ष नंदकुमार कावळे, कार्याध्यक्ष गजानन वाघमारे, विविध उपक्रम कार्यवाह गणेश भोयर, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह उदय नरवाडे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प कार्यवाह अर्चनाताई भरकाडे, युवा सहभाग कार्यवाह राज पाटील नरवाडे तसेच संजय विजय नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
__________________________________________
बैठकीत पुढील महिन्यात राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा आणि बुवाबाजी मागील वैज्ञानिक कार्यकारणभाव उलगडण्यासाठी विशेष जाहीर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तसेच  वैज्ञानिक दृष्टीकोन, विवेकवाद आणि समाजातील अंधश्रद्धेविरोधात प्रभावीपणे काम करण्यासाठी युवकांना सक्षम करण्याचा समितीचा उपक्रम.गावोगाव जनजागृती मोहीम, घरगुती बैठका, वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे संघटनेला व्यापक रूप देण्यावरही भर देण्यात आला.

⬛ बैठकीत झाला ठराव

अंधश्रद्धेविरोधातील लढा आणखी भक्कम करण्यासाठी आणि समाजात वैज्ञानिक विचारांची बीजे रोवण्यासाठी पुढील काळात अधिक व्यापक, संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या