उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांची धडपड शिगेला राजकीय प्रतिष्ठेची लढत अधिक चुरशीची

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सुरू केलेली धडपड शिगेला पोहोचली आहे. अनेक प्रभागांत तिढा टाळण्यासाठी आणि आपापल्या पॅनलला मजबूत करण्यासाठी मोठ्या नेत्यानं उशिरापर्यंत बैठकांच्या फैरी झाडल्याच्या चर्चांना उधाण आले असून निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत निर्माण झाली आहे.
शहरातील प्रमुख राजकीय घराणी, नव्या शक्तीसमूहांचे उदय, तसेच दोन-तीन पॅनलमधील उमेदवारांची स्पर्धा यामुळे अनेक प्रभागांत एकाच गटातून दोन-दोन इच्छुकांनी अर्ज भरल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर उमेदवारी कमी करा, मतांची विभागणी टाळा अशी ओरडच सुरू झाली. त्यानंतर प्रमुख पक्ष व पॅनलचे नेते स्वतः पुढे सरसावत उमेदवारांना मागे घेण्यासाठी आर्जव, दबाव, मनधरणी ,चर्चांच्या मालिकाच सुरू आहेत.
काही प्रभागांत उमेदवार मागे घेण्यासाठी सत्ताधारी गट आणि विरोधकांकडूनही जोरदार प्रयत्न झाले. कुणाला पदाचे आश्वासन, तर कुणाला भविष्यातील राजकीय समीकरणात स्थान देण्याच्या चर्चाही पार पडल्याचे शहरात चर्चेचा विषय बनले.काही उमेदवार मात्र घोंगडी ताणून ठेवत नेत्यांची कोंडी करत असल्याचे कळते.
या धावपळीमुळे शहरातील निवडणूक तापमान आणखी वाढले असून, २ डिसेंबरला होणारी उमरखेड नगरपरिषद निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार यात शंका नाही. कोणाच्या रणनीतीला यश मिळाले ? कोणाचा पॅनल एकसंध उभा राहिला ? कोणाची मतविभाजनाची भीती कायम राहिली ? यावरच निवडणुकीची दिशा अवलंबून राहणार आहे.
