बोरी इजारा शेतशिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकरी भयभीत – सापळा लावून तात्काळ जेरबंद करण्याची मागणी

 

⚫ लोकवेध 

बोरी इजारा व साई इजारा परिसरात दोन दिवसांपासून बिबट्या किंवा तत्सम वन्यप्राण्याचा वावर वाढल्याने शेतकरी गावकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुकर खेमा राठोड व पितू राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना मोठमोठ्या डरकाळ्या आणि गुरगुरल्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी जीव मुठीत धरून शेतातून पळ काढला व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सतर्क केले.

 

आज (१९ नोव्हेंबर) पुन्हा एकदा बोरी इजारा परिसरातील विशाल जाधव व गोपाल जाधव यांच्या शेताजवळील नवाटीजवळ कापूस वेचणीसाठी गेलेल्या प्रकाश दुमारे, आयुब भाई आणि अन्य मजुरांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली.हा निश्चितच बिबट्या आहे,असा दावा शेतकरी आयुब भाई यांनी केला.

 

या संदर्भात वनविभागाकडून अद्याप तो बिबट्या की वाघ याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नसली तरी परिसरात वन्यप्राण्यांची हालचाल वाढल्याचे निश्चित मानले जात आहे.शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे, कारण रब्बी हंगामाची लगबग सुरू असून गहू-हरभऱ्याच्या पेरणीबरोबरच कापूस वेचणीही सुरू आहे. दिवसा वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बिबट्याच्या वावरामुळे धोका अधिकच वाढला आहे.

 

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकरी नेते मनीष जाधव यांनी काळी दौलत खान वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांच्याशी तात्काळ संपर्क साधून सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.खरीपात ओल्या दुष्काळाने आधीच आर्थिक घाव बसलेल्या शेतकऱ्यांवर आता वन्यप्राण्यांचा सैराट धोका ओढवला आहे.त्यामुळे तातडीने ट्रॅप लावून बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी त्यांनी केली.

 

वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांनी बिबट्याच्या वावराला दुजोरा दिला असून या भागात वाढीव गस्त व जनजागृती मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी मोरवाडी, पेवठाण शिवारात रानडुक्करासह सात नऊ जनावरे फस्त केल्याची नोंद आहे. खामलवाडी व ब्रह्मी शिवारातही बिबट्याचे दर्शन आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भयाचे सावट आहे.

 

घटनेनंतर वनविभागाचा पथक बोरी इजारा शेतशिवारात दाखल झाले असून शेतकरी-मजुरांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या जात आहेत. लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व शिताफीने सापळे लावण्याचे काम सुरू होणार आहे.यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव, श्री. प्रशराम डवरे, माजी जि.प. सदस्य, वनविभागाचे आर. जे. केंद्रे, एम. डी. हगवणे, जी. बी. वाडगे, वनरक्षक विशाल जाधव, काळूलाल नगर, पोलीस पाटील शंकर पवार (खामलवाडी) तसेच शेतकरी गोपाल जाधव आणि आयुब भाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या