खरीप हंगामासाठी महागाव सज्ज ! ‘साथी’ पोर्टलमुळे कृषी विक्रीत पारदर्शकतेचा नवा अध्याय

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-

महागाव तालुका कृषी विभागाकडून खरीप हंगाम २०२६ पूर्व नियोजन सभा उत्साहात पार पडली. तहसील कार्यालय येथे आयोजित या सभेत कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शनासह ‘साथी’ पोर्टल वापराचे प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावी हा होता. कृषी आयुक्तालय, पुणे येथून ऑनलाईन माध्यमातून झालेल्या प्रशिक्षणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘साथी’ पोर्टलद्वारे बियाणे विक्रीची सविस्तर माहिती दिली.

डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करून व्यवहार पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला.दरम्यान यानंतर तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. सध्या तालुक्यात सुमारे ५० टक्के खतसाठा उपलब्ध असून हंगामात तुटवडा भासणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. अफवांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,असे आवाहनही त्यांनी केले. तसेच विक्रेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कृषी निविष्ठांची विक्री करावी,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

गुण नियंत्रण निरीक्षक भारत चेके यांनी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अनधिकृत व प्रतिबंधित एचटीबीटी कॉटन बियाण्यांची विक्री टाळावी, अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करावी, जादा दर आकारू नये, शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे आणि सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच ‘SATHI SaleEasy’ या मोबाईल ॲपद्वारे बियाणे विक्रीची प्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रातून विक्रेत्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कृषी निविष्ठा खरेदी करताना कोणतीही अडचण आल्यास थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा असे यावेळी सांगण्यात आले.
या आयोजित सभेला तालुका कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील राऊत यांच्यासह महागाव तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या