पुसदमध्ये स्वीटमार्ट संचालकाची दादागिरी; ग्राहकांना उरलेले पैसे देण्यास नकार

लोकवेध न्यूज नेटवर्क
पुसद : –
शहरातील एका स्वीटमार्टमध्ये ग्राहकांशी उद्धट वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महागाव येथून आलेल्या दोन ग्राहकांना नाश्ता करताना उरलेली रक्कम परत देण्यास नकार देत संचालकाने दादागिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकांनी स्वीटमार्टमध्ये प्रवेश केल्यानंतर संचालकाच्या क्यूआर कोडवर १०० रुपये ऑनलाइन जमा केले. त्यानंतर “जेवढे खाऊ तेवढे घेऊन उर्वरित रक्कम परत द्यावी” अशी त्यांनी विनंती केली. मात्र, संचालकाने उर्वरित पैसे परत मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगत “बाकी रकमेच्या बदल्यात आणखी जिन्नस घ्या, अन्यथा पैसे विसरा” असे खडसावून सुनावले.
या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. उपस्थित इतर ग्राहकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संचालक कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. उलट “आम्हाला शहाणपण शिकवू नका” असे म्हणत त्याने अधिकच उग्र भूमिका घेतल्याचे सांगण्यात येते.
ग्राहकांनी “अशा प्रकारची अट असल्यास दुकानात स्पष्ट सूचना फलक लावावा” अशी मागणी केली असता संचालक आणखी भडकला. अखेर वाद निवळला असला तरी या प्रकारामुळे संबंधित ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
या घटनेमुळे व्यापाऱ्यांची ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी व विनम्रता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. “हम करे सो कायदा” या पद्धतीने वागणाऱ्या काही दुकानदारांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त
होत आहे.
