तक्रारींचा बदला की कायद्याचा गैर वापर ? पत्रकारावर गुन्ह्यांमुळे उमरखेडमध्ये खळबळ”
लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड : –
अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरच गंभीर गुन्हे दाखल झाल्याने उमरखेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.धाडस ००७ या युट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांच्यावर उमरखेड पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत,अशी ठाम मागणी तालुक्यातील दैनिक वृत्तपत्र प्रतिनिधींनी केली आहे.याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनानुसार, शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू, जुगार, गांजा आदी धंद्यांविरोधात अमित देशमुख यांनी सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्या तसेच पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी सादर केल्या.याचाच राग मनात धरून उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. १२ मार्च रोजी रात्री सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास एका तक्रारदाराच्या फोनवरून अमित देशमुख पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांच्याविरोधात मध्यरात्रीच जातीय तेढ निर्माण करणे,युवकांना चिथावणी देणे व शासकीय कामात अडथळा आणणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.ही संपूर्ण कारवाई नियोजित व अन्यायकारक असल्याचा दावा पत्रकारांनी केला आहे.
या प्रकरणामुळे केवळ एका पत्रकारावर अन्याय झाला नसून,अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व पत्रकारांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करून संबंधित गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक, महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मुडे, प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षा सौ. सविता चंद्रे यांच्यासह लक्ष्मीकांत नंदनवार, अरविंद ओझलवार, निळकंठ धोबे, व्यंकटेश पेन्शनवार, गजानन भारती, शैलेश ताजवे, डॉ.विशाल माने, अरुण बेले, भिमराव नगारे, अविनाश मुन्नरवार, अझरउल्ला खान, वसंत देशमुख, ताहेर मिर्झा, संतोष कलाने, संजय देशमुख, विजय आडे, दत्तात्रय देशमुख,ज्ञानेश्वर ठाकरे, राजू गायकवाड,स्वप्नील मगरे,सुनिल ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.या घटनेमुळे उमरखेडमध्ये पत्रकार,व्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून लोकशाहीचा गळा आवळण्याचे हे, कटकारस्थान असल्याची जनभावना आहे.त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पत्रकार गप्पं नसणार नाहीत. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू असा इशारा देखील देण्यात आला आहे.

