सुतगिरणीत कोट्यवधींचा घाटा; व्यवस्थापनावर गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी “

लोकवेध न्यूज नेटवर्क / ३० मार्च 

पुसद:- 

 

पुसद येथील बाबासाहेब कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणी पिंपळगाव कान्हा येथे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून,संस्थेचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व काही संचालक मंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.याबाबत पंजाबराव देशमुख (खडकेकर), रा. खडका ता. महागाव जि. यवतमाळ यांनी वस्त्रोद्योग आयुक्तालय,नागपूर येथे तक्रार दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सुतगिरणी गेल्या चार वर्षांपासून कन्व्हर्शन कॉस्टच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने भाड्याने देण्यात येत असून,दरवर्षी कारभारी बदलले जात आहेत.या प्रक्रियेमुळे दर महिन्याला सुमारे १ कोटी रुपयांचा तोटा होत असून संस्थेवर कर्जाचा बोजा वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३१ डिसेंबर २०२४ रोजी सुतगिरणी कृष्णा फायबर्स, आकोट यांना १.५ कोटी रुपये अग्रीम घेऊन भाड्याने देण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये मंजीत कॉटन, गुंज यांच्यासोबत नवीन करार करण्यात आला. मात्र, या व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तसेच गाठींचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

कामगारांवर अन्याय,दादागिरी, अपघातग्रस्तांना मदतीचा अभाव, अंतिम देयके न देणे अशा अनेक गंभीर बाबींचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.यामुळे परिसरातील कामगार सुतगिरणीत काम करण्यास तयार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, संचालक मंडळाच्या २५ मार्च २०२६ रोजी झालेल्या विशेष बैठकीत नवीन जॉबवर्क प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तसेच ३० मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.मात्र, यामध्येही आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर प्रकरणात बँक व्यवहार, अनादरित धनादेश,वीज बिल थकबाकी, तसेच पूर्वी मिळालेल्या १४ कोटी रुपयांच्या निधीच्या वापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या