रेती घाट प्रकरणावर पत्रकार परिषद; पाटील यांचे पोलिसांवर खंडणीचे आरोप,पोलिसांचा इन्कार

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०२ एप्रिल
उमरखेड :-
हदगाव–उमरखेड तालुक्यातील चातारी/दिघी रेती घाट प्रकरणावर उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपली भूमिका मांडत पोलिसांवर गंभीर आरोप केले.
पाटील म्हणाले की,आम्ही लिलाव झालेल्या रेती घाटावर नियमांनुसार उत्खनन करत आहोत.अशा परिस्थितीत पोलिसांनी पैशांची मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही. मला खासदार पुत्र असल्यामुळे जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिघी रेती घाट हा मराठवाडा हद्दीत येत असून आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात काम करत असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी असा आरोप केला की, एलसीबीचे पीएसआय शरद लोहकरे यांनी रेती मजूर असलेल्या कार्यकर्त्याच्या कानाला रिव्हॉल्वर लावून खंडणी मागितली.या प्रकारातून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला असून या गोंधळात त्यांच्या वाहनाची काच फोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, उमरखेड पोलीस ठाण्यात नोंद करूनच पथक कारवाईसाठी गेले होते. त्यांच्या सोबत एसडीएम कार्यालयाची टीमही होती. घटनास्थळी पोहोचताच रेती काढणारे ट्रॅक्टर नांदेड बाजूकडे निघून गेले, त्यामुळे पुढील कारवाई करता आली नाही. कोणालाही पिस्तूल दाखवले नाही किंवा पैशांची मागणी करण्यात आलेली नाही, असा पोलिसांचा दावा आहे.तसेच या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे केल्याने वाद अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, सत्य समोर येण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.
वरील विषयी, सदर घटना घडल्यानंतर आमचे पथक त्याठिकाणी चौकशी करिता गेले होते.कृष्णा पाटील यांनी सदर घटना घडल्यानंतर आमच्याशी संपर्क केला.त्यामुळे आम्ही आमचे कर्मचारी पाठवून तपास केला.
राम मुळे,उपविभागीय महसूल अधिकारी.उमरखेड
