भक्तीचा जल्लोष  अंबाळीत शिवपुराण कथा सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

विनोद यादवकुळे

लोकवेध न्यूज नेटवर्क / २० मार्च

उमरखेड :-


अंबाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही यादवकालीन हेमाडपंती महादेव मंदिर परिसरात शिवपुराण कथा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात सुरू आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ झालेला हा बाराही दिवसांचा ज्ञानयज्ञ कथा, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहे.
या सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने सहकार्य केले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. प्रसिद्ध शिवकथाकार ह.भ.प. स्वातीताई घ्यार पाटील (झी टीव्ही फेम, हिंगोली) यांच्या रसाळ आणि प्रभावी वाणीतून शिवपुराण कथेला सुरुवात झाली आहे.
कथेमार्फत समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांपासून दूर राहून सुसंस्कारी समाज घडवण्याचा संदेश दिला जात आहे. विशेष म्हणजे या धार्मिक उपक्रमात युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत असून “नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी” या संतविचारांवर आधारित निर्व्यसनी व संस्कारी समाज निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या सोहळ्यामुळे संपूर्ण अंबाळी नगरी सध्या भक्तिमय वातावरणात रंगून गेली असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या