चौकशीचा खेळ की कारवाईचा अभाव ? महागाव पंचायत समिती प्रकरणात प्रशासनावर प्रश्नचिन्ह
लोकवेध न्युज नेटवर्क / १८ मार्च
महागाव : –
पंचायत समिती महागाव येथील कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्याविरोधातील गंभीर तक्रारींवर अखेर जिल्हा परिषद यवतमाळ प्रशासनाने हालचाल करत दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. मात्र, वारंवार चौकशा होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
महागाव तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेने दिलेल्या तक्रारीनंतर तसेच १६ मार्च २०२६ रोजी प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व उपअभियंता यांच्या सदस्यत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, संबंधित अभियंत्याविरुद्ध यापूर्वीही अनेक वेळा चौकशी होऊन दोष आढळल्याच्या चर्चा असूनही कोणतीही ठोस प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाई झालेली नाही. त्यामुळे चौकशी हा केवळ वेळकाढूपणा आहे का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान,ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष अरबाज खान पठाण यांनी या प्रकरणात थेट फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. “ही केवळ एक तक्रार नसून दीर्घकाळ चालत आलेल्या अनियमिततेची मालिका आहे. वारंवार चौकशी करून उपयोग नाही; दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
याशिवाय संबंधित अधिकाऱ्याच्या अधिकृत कागदपत्रांवरील हस्ताक्षरांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे. अधिकारी स्वतः काम न करता इतरांकडून अधिकृत कामे करून घेत असल्याचा आरोप गंभीर मानला जात असून, यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर विकासकामांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त होत आहे. नव्याने नेमलेली चौकशी समिती निष्पक्ष अहवाल सादर करणार का आणि त्यानंतर प्रशासन खरोखरच कठोर कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
———————————————————————-
वरील विषया संदर्भात ठाणेदार धनराज निळे यांच्याशी वार्तालाप केला असता.ते म्हणाले या संदर्भात दोन्ही पार्टीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यात चौकशी सुरू आहे. यात अजून गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
