पोखरी घाटातील नीलगाय शिकार प्रकरणाने खळबळ;अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावरही प्रश्नचिन्ह

लोकवेध न्युज नेटवर्क / ११ मार्च
महागाव : –
काल दिनांक १० मार्च रोजी काळी दौलत खान वनपरिक्षेत्रातील पोखरी घाट परिसरात नीलगायीची निर्घृण शिकार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची कार्यवाही सुरू केली. मात्र या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर येत असतानाही वरिष्ठांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक शशांक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.दरम्यान, गस्त न राखणे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यालयी वास्तव्यास नसणे या कारणांमुळे काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वनसंपदा आणि वन्यजीव धोक्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. शासनाकडून वन्यजीवांच्या तहान भागविण्यासाठी दरवर्षी पाणवठ्यांवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र काही ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने निलगाय, हरिण, बिबटे, अस्वल यांसारखे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकंती करतात. अशा परिस्थितीत निलगाय, हरिण आणि रानडुकरांच्या शिकारीच्या घटना वाढत असल्याने वन प्रशासनालाही यासाठी जबाबदार धरले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनपरिक्षेत्रातील बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
बॉक्स :
वनपाल ‘उंटावरून शेळ्या हाकतोय’
गुंज बीट अंतर्गत येणाऱ्या पोखरी परिसरात नीलगाय शिकार झाल्याची घटना समोर आली असताना परिसरात दिवसाढवळ्या माती व मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याचेही चित्र आहे. मात्र संबंधित वनपाल स्थानिक ठिकाणी वास्तव्यास नसून ते दररोज दिग्रस येथून ये-जा करीत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील घडामोडींवर योग्य लक्ष राहत नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. परिणामी वनव्यवस्थापनात ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’ प्रकार सुरू असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
