पोखरी घाटात पुन्हा ‘रोही’ची शिकार; काळी (दौ.) वनपरिक्षेत्रात खळबळ

लोकवेध न्यूज नेटवर्क / १० मार्च
महागाव :-
यवतमाळ जिल्ह्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोखरी घाट परिसरात पुन्हा एकदा निलगायीची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून निलगाय (रोही) पकडून तिची धारदार शस्त्रांनी हत्या केली आणि काही अवयव कापून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात निलगायीचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून शिकाऱ्यांनी केलेल्या नियोजित शिकारीचा असल्याचे स्पष्ट झाले. निलगायीचे पाय,पोटातील काही अवयव आणि मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचे दिसून आले.
या प्रकरणाबाबत काळी (दौ.) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे वनविभागाच्या गस्त व्यवस्था व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे,याच वनपरिक्षेत्रात १६ एप्रिल २०२४ रोजी तीन निलगायांची शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळीही वनविभागाची यंत्रणा निष्क्रिय ठरल्याने स्थानिक गुन्हे शाखेला हस्तक्षेप करावा लागला होता. त्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती,तर दोन आरोपी फरार झाले होते.

दरम्यान,पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने वनविभागाच्या निष्काळजीपणावर स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.वन्यजीव संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून दोषींना अटक करावी आणि वनपरिक्षेत्रातील बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
———————————————————————-

वनपाल हाकतोय उंटावरून शेळ्या..

गुंज बीट अंतर्गत येणाऱ्या पोखरी परिसरात नीलगाय शिकार झाली असून दररोज दिवसा ढवळ्या माती,मुरूम उत्खनन होत असल्याचे चित्र आहे.वनपाल हे उख्यालयी राहत नाहीत.ते दररोज दिग्रस येथून ये जा करतात.त्यामुळे वनपरिक्षेत्रात होत असलेल्या घटना घडामोडीचे यांना किंचतही खबर लागत नाही.त्यामुळे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार म्हटल्यास वावगे ठरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या