बाटली आडवी करण्याच्या आंदोलनाला वेग; महिलांच्या सह्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण

लोकवेध न्यूज नेटवर्क / ७ मार्च

महागाव :-


महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये भर व्यापारपेठेत सुरू करण्यात आलेल्या देशी दारू दुकान आणि वाईनबार विरोधातील आंदोलनाला आता प्रशासनिक पातळीवर वेग आला आहे. दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांनी दिलेल्या सामूहिक निवेदनावरील सह्यांची पडताळणी प्रक्रिया शनिवार, ७ मार्च रोजी पार पडली.

सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभागातील महिलांची उपस्थिती घेऊन त्यांच्या सह्यांची अधिकृत पडताळणी केली. प्रभाग क्रमांक १ मध्ये कै. वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्रालगत सुरू असलेले देशी दारू दुकान (सीएल-३ क्र. ७९) तसेच शेजारील बैठक वाईनबार बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
या संदर्भात प्रभागातील महिलांनी २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग, यवतमाळ यांच्याकडे सामूहिक निवेदन सादर केले होते.

निवेदनावर सुमारे ५० महिलांच्या सह्या असल्यामुळे त्यांची अधिकृत पडताळणी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज संबंधित महिलांची उपस्थिती घेऊन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
दरम्यान, महिलांच्या सह्यांची पडताळणी झाल्यानंतर काही दिवसांतच दारू दुकान बंद करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रभाग दारूमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ‘बाटली आडवी’ आंदोलनाला आता अधिक गती मिळाली आहे.

दारू दुकान सुरू झाल्यापासून परिसरातील वातावरण बिघडल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. दारू पिऊन काहीजण रस्त्यावर लोळत असल्याचे तसेच कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर मद्यपींच्या बैठका रंगत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे प्रभाग दारूमुक्त करण्यासाठी मतदानाद्वारे बाटली आडवी करणे ही काळाची गरज असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

या आंदोलनामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.रंजना दीपक आडे यांचा सक्रिय सहभाग दिसून आला असून या आंदोलनाच्या प्रणेत्या तथा नगरसेविका जयश्री नरवाडे,माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे,हे दारू दुकानाविरोधातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून जेष्ठ नेते संभाजी नरवाडे यांचा सुद्धा या आंदोलनात सहभाग दिसत आहे.त्यामुळे आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहूजाता देशी दारू दुकानाला कायमचे बंद करण्यासाठी आंदोलन पेटल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावेळी आंदोलनाच्या प्रणेत्या जयश्रीताई नरवाडे,ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक संभाजी नरवाडे, रामराव पाटील नरवाडे, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुरेश पाटील नरवाडे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दीपक आडे,डॉ.पंजाबराव राठोड,आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, पडताळणी प्रक्रियेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी. एस. वाघ, उपनिरीक्षक अनिल पिकले, उपनिरीक्षक सुकेशनी शिंदे, जमादार पंजाब राठोड, वाघजी बोंबले,तसेच कॉन्स्टेबल प्रतीक्षा उके आणि पुनम गटलेवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या