विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार !
लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ फेब्रुवारी
महागाव:-
महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया काल दिनांक ५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. ही घटना दहावीच्या परीक्षेदरम्यान घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१४ वर्षीय पीडित मुलगी ही,काळी दौलत खान येथील अतहर मिर्झा विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे.तिच्या तक्रारीनुसार, गावातील सुजीत देविदास राठोड हा मागील सुमारे वर्षभरापासून तिचा पाठलाग करत होता.भीतीपोटी तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला नव्हता.
दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून दहावीची परीक्षा सुरू झाली. दि. २७ फेब्रुवारी रोजी इंग्रजीच्या पेपरदरम्यान आरोपी वर्गात शिरला व विद्यार्थिनीचा हात धरून तिचे हॉलतिकीट हिसकावून घेतल्याची घटना घडली. त्या वेळी उपस्थित शिक्षिकेने हस्तक्षेप केल्याने तो तेथून निघून गेला,असे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर दि. ०४ मार्च २०२६ रोजी हिंदीच्या पेपरनंतर दुपारी शाळेसमोरील मैदानातून जात असताना आरोपीने विद्यार्थिनीला धक्का देत वाईट उद्देशाने तिचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला.तिचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपीने त्यांनाही मारहाण करून तेथून पळ काढल्याचे सांगण्यात आले आहे.
घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर विद्यार्थिनीने वडिलांसह पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी सांगितले की,या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून अधिकृत तक्रार प्रक्रियेत आहे.तपासानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
