ब्लास्टिंग’चा बेफिकीर स्फोट : नियम धाब्यावर,विम्याविना मजुरांचा बळी; प्रशासन झोपेत ?

लोकवेध न्यूज नेटवर्क / उमरखेड, दि.२१ फेब्रुवारी
उमरखेड :-
तालुक्यातील अंबाळी शेतशिवारात विहीर खोदकामासाठी करण्यात आलेल्या ब्लास्टिंगदरम्यान उडालेल्या दगडाने एका मजुराचा काल दिनांक २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोंडबा उर्फ कैलास जळबा अडकीने (वय ५०, रा. ब्राम्हणगाव) यांच्या मृत्यूने निष्काळजीपणाचा गंभीर मुद्दा समोर आला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अंबाळी येथील शेतमालक माधव यादव हनवते यांच्या शेतात शासकीय योजनेतून विहीर खोदकाम सुरू होते. सुरुवातीच्या थरात काळा दगड लागल्याने तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आले. मात्र ब्लास्टिंगदरम्यान परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता का, मजुरांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले होते का,तसेच हेल्मेटसारखी संरक्षण साधने देण्यात आली होती का, याबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहेत.
ब्लास्टिंग सुरू असताना विहिरीपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या मजुरांपैकी कोंडबा अडकीने यांच्या चेहरा व डोक्याला उडालेला मोठा दगड जोरात लागला. त्यांना तात्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे ब्राम्हणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व ठाणेदार निलेश शेंबडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोफाळी ठाणेदार निलेश शेंबडे यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेध न्यूजशी बोलतांना सांगितले.
दरम्यान, ब्लास्टिंगसाठी शासनाने स्पष्ट अटी व सुरक्षा नियम घालून दिलेले असतानाही प्रत्यक्षात विनासुरक्षा कामे सुरू असल्याची चर्चा आहे. मजुरांसाठी कोणताही विमा नसताना त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. उमरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने ब्लास्टिंग करून विहिरीचे काम सर्रास सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा धोकादायक कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
