विशेष मुलांचा शिवशौर्याने दुमदुमला कल्पतरू विद्यालय परिसर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ फेब्रुवारी
यवतमाळ :-
बूटीबोरी (नागपूर) : संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळेत गुरुवारी (दि. १९ फेब्रुवारी २०२६) छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या मूर्तीला विधीपूर्वक अभिषेक करून झाली. त्यानंतर विशेष शिक्षकांच्या हस्ते आरती सादर करण्यात आली. “जय शिवाजी, जय भवानी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे शिवरायांच्या शौर्यगाथा मांडल्या. “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताने कार्यक्रमात अभिमानाची भावना अधिक दृढ झाली. शिक्षकांनी शिवाजी महाराजांचे नेतृत्व, स्वराज्याची संकल्पना आणि त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर सोप्या भाषेत मांडले.
इतिहासाची जिवंत अनुभूती मिळावी यासाठी शिवरायांच्या जीवनावर आधारित माहिती व किल्ल्यांचे व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आले. विशेष मुलांनी उत्साह, आत्मविश्वास आणि जोशपूर्ण सहभागातून आपली कला सादर केली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले “प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी खान” या पोवाड्यावर विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी नाट्यरूप सादरीकरण. अफजलखान व शिवराय यांच्या ऐतिहासिक प्रसंगाचे त्यांनी दमदार अभिनयातून जिवंत चित्र उभे केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते. विशेष मुलांच्या जिद्दीने आणि प्रतिभेने “प्रत्येक मूल सक्षम आहे” हा प्रेरणादायी संदेश दिला. कल्पतरू शाळेतील ही शिवजयंती सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली.
