पुसद ग्रामीण हद्दीत गांजा तस्कर जेरबंद; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १४ फेब्रुवारी
पुसद : –
यवतमाळ जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करीवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुसद ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या इसमाला अटक केली. या कारवाईत ६ किलो २७२ ग्रॅम गांजा, तसेच मोटारसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड–पुसद उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, मौजे साई ईजारा ते काळीदौ मार्गावरून एक इसम मोटारसायकलवर गांजा घेऊन येणार आहे. माहितीची खात्री करून पथकाने साई ईजारा गावाजवळील नाल्याजवळ सापळा रचला. सायंकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास संशयित इसम मोटारसायकलवर प्लास्टिकच्या पिशवीसह येताना दिसताच पोलिसांनी शिताफीने त्याला थांबवून ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिशवीत ६ किलो २७२ ग्रॅम गांजा आढळून आला. अटक केलेल्या इसमाचे नाव सुनील दादाराव आगोसे (वय ३२, सध्या रा. भिलवाडी ता. दिग्रस, मूळ रा. हिवळणी ता. महागाव) असे असून त्याच्याविरुद्ध अंमली औषधी व मन:प्रभावी पदार्थ कायद्यानुसार पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.जिल्ह्यातील अवैध धंदे व अंमली पदार्थ तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी भीती न बाळगता माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
