तलवारींच्या नृत्यावरून गुन्हा; उर्दू शाळेतील कार्यक्रमाने पेटवली राजकीय ठिणगी
⚫लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ फेब्रुवारी
उमरखेड :-
नगरपरिषद उर्दू अब्दुल गफुर शहा शाळा क्र. ०२ येथे सादर करण्यात आलेल्या ‘ए मर्द मुजाहीद’ या गाण्यावरून उसळलेल्या वादाला अखेर कायदेशीर वळण मिळाले असून मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभर चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणासह शैक्षणिक व सामाजिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक गोपाल कलाणे (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास शाळेसमोरून जात असताना ‘ए मर्द मुजाहीद तेरी यलगार कहा है, तस्बीह तो है हाथ में तलवार कहा है’ हे गाणे वाजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शाळेत पाहणी केली असता इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रतिकात्मक तलवारींसह त्या गाण्यावर नृत्य सादर केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित गाण्यातील काही ओळी इतर धर्मीयांविरोधात द्वेष किंवा बलप्रयोगाची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
सरकारी शाळेत अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम करणारे असून सामाजिक सलोखा बिघडवू शकतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक अन्सारउल्लाखान अब्दुल मन्नानखान (५५) व नृत्यरचना शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी (५४) यांनी केल्याचा आरोप आहे. दोघेही शासकीय सेवेत कार्यरत असून भारतीय न्याय संहिता कलम १९६ (१)(सी) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी पत्रकार परिषद घेऊन परस्परविरोधी भूमिका मांडण्यात आल्या. तक्रारदार गटाने कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांकडे पाठपुरावा केला, तर दुसऱ्या बाजूने हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग असल्याचे सांगत आरोप फेटाळण्यात आले. गाण्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण राज्यभर गाजले आणि विविध संघटनांकडून कारवाईची मागणी करण्यात आली.
पोलिसांनी चौकशीसाठी वेळ घेतल्यानेही चर्चेला उधाण आले होते. अखेर गुन्हा नोंद झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा काय राहणार, संबंधितांवर प्रशासकीय कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक सलोखा, शालेय मूल्यसंस्कार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करणारे हे प्रकरण स्थानिक राजकारणातही ठिणगी टाकणारे ठरत असून येत्या काळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या,गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सागर इंगळे करीत आहेत.
