तुलसी टी पॉईंट’मध्ये जेवणात निघाला शिजलेला किडा,तक्रार केल्यावर ग्राहकाला धमकी, अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १२ फेब्रुवारी
उमरखेड :-
शहरातील महागाव रोड परिसरात नव्याने सुरू झालेल्या ‘तुलसी टी पॉईंट’ हॉटेलमध्ये जेवणात शिजलेला किडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याबाबत जाब विचारणाऱ्या ग्राहकाला मालक–व्यवस्थापकांकडून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस वसाहत,उमरखेड येथील रहिवासी निलेश रंगराव राऊत (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास ते कुटुंबासह उमरखेडजी – नांदेड बायपास राज्य मार्गालगत असलेल्या ‘तुलसी टी पॉईंट’ येथे जेवणासाठी गेले होते.जेवणादरम्यान प्रथम दाल तडक्यात दगड आढळल्याचा प्रकार घडला. त्यानंतर मागविलेल्या पनीर मसाला स्पायसी भाजीमध्ये कच्च्या मिरच्या बारीक करून टाकण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, त्यांच्या सात वर्षीय मुलाने भातामध्ये किडा दिसत असल्याचे सांगितले. तपासून पाहिल्यानंतर तो शिजलेला किडा असल्याचे आढळून आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल मालक–मॅनेजर यांना विचारणा केली असता त्यांनी उद्धट वर्तन करत फोटो काढण्यास मनाई केली व “तुमच्याकडून जे होते ते करा, लवकर निघून जा, नाहीतर बघून घेईन,अशा अर्वाच्य शब्दांत धमकी दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे धास्तावलेल्या राऊत कुटुंबाने अर्धवट जेवण सोडून बिल भरले व हॉटेलमधून बाहेर पडल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित हॉटेलचे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ असल्याचा आरोपही करण्यात आला असून, अशा निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
नव्याने सुरू झालेल्या हॉटेलमध्येच असा प्रकार उघडकीस आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित हॉटेलची तातडीने सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरातील सर्व हॉटेल, धाबे व रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.या प्रकरणी पोलीस व अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————
अन्न व औषध प्रशासन विभाग या संदर्भात कुठलीही कार्यवाही करतांना दिसत नसून आमच्याकडे स्टाफ कमी आहे,जिल्ह्याचे काम आमच्याकडे भरपूर असते.तुम्ही स्वतः लेखी तक्रार द्या.यावरून आम्ही योग्य ती कार्यवाही करू.असा सतत त्यांचेकडून सल्ला देण्यात येते.त्यामुळे या संदर्भात थेट मुख्यमंत्र्याकडे सदर विषया संदर्भात उमरखेड येथून एक शिष्ट मंडळ जाणार असून. जिल्हा स्तरावरील कार्यवाही झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
