तडीपार आदेशाला हरताळ; उमरखेडमध्ये दोन जण गजाआड

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

उमरखेड : – 

यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या दोन इसमांनी आदेशाला धाब्यावर बसवत उमरखेड परिसरात वावर केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत असलेल्या पोलिस प्रशासनाने या प्रकरणात झटपट हालचाल केली.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यात अवैध धंदे,अवैध शस्त्र बाळगणे, अवैध उत्खनन आणि सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १० फेब्रुवारी २०२६ रोजी उमरखेड उपविभागात तडीपार आरोपींचा शोध घेत होते.दुपारी ऋतेश तिवारी (वय २४, रा. विडुळ, ता. उमरखेड) हा उमरखेड परिसरात आढळून आला. त्याला यापूर्वीच उपविभागीय अधिकाऱ्यांनी यवतमाळ, नांदेड, हिंगोली व वाशीम या चार जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार केले होते. त्यानंतर रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास शेख गौस शेख करीम (वय २२, रा. नागापूर रुपाळा, ता. उमरखेड) हा उमरखेड-ढाणकी रोडवरील ब्रिज परिसरात आढळला.दोघेही तडीपार आदेशाचे उल्लंघन करताना सापडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे,पोउनी शरद लोहकरे यांच्या पथकाने केली.तडीपार आदेश मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे.तसेच यात महागाव संदर्भातही मागील वर्षी प्रस्ताव होता.या प्रस्तावाचे नेमके काय झाले अशी जनभावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या