तीन महिन्यांपासून कमिशन थकीत; महागाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांची आर्थिक कोंडी, तत्काळ देयकांची मागणी

लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ फेब्रुवारी
महागाव :-
महागाव : महागाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांचे मागील तीन महिन्यांपासून कमिशन थकीत असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. तालुक्यातील अनेक दुकानदारांची परिस्थिती हलाखीची झाली असून शासनाकडून मिळणाऱ्या कमिशनवरच त्यांचा व्यवसाय अवलंबून आहे.
दर महिन्याला शासनाकडून धान्य उचलून ते दुर्गम व खेड्या भागात नेऊन वितरण करण्यासाठी वाहतूक खर्च, मजुरी, दुकान भाडे, वीजबिल तसेच इतर प्रशासकीय खर्च करावे लागतात. मात्र कमिशन वेळेवर मिळत नसल्याने हा खर्च आता परवडणारा नसल्याचे दुकानदारांनी सांगितले. काही दुकानदारांना तर उधारीवर काम करावे लागत असून कर्जाचा बोजाही वाढत आहे.
कमिशन थकबाकीमुळे रास्त धान्य वितरण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुकानदारांना वेळेवर पैसे न मिळाल्यास नियमित धान्य वितरण करणे कठीण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरून तातडीने हस्तक्षेप करून थकीत कमिशन तत्काळ अदा करावे, अशी मागणी रास्त धान्य दुकानदारांकडून करण्यात येत आहे. तसेच पुढील काळात कमिशन नियमित व वेळेत मिळावे, यासाठी ठोस यंत्रणा उभी करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
