चार वर्षांपासून सभागृह हस्तांतरणाचा ठराव रखडला; मौलाना अबुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने दिला उपोषणाचा इशारा

लोकवेध न्यूज नेटवर्क/ ०९ मार्च
महागाव :-
महागाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १६ मधील मुस्लिम वसाहतीतील सामाजिक सभागृह आणि त्यालगतची नगरपंचायतीची खुली जागा मौलाना अबुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महागाव यांना देण्याचा ठराव मंजूर होऊनही चार वर्षांपासून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संस्थेच्या वतीने नाराजी व्यक्त करत नगरपंचायतीकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत १४ मार्च २०२२ रोजी ठराव क्रमांक ३२ मंजूर करण्यात आला होता. या ठरावानुसार मुस्लिम वसाहतीतील सामाजिक सभागृह व त्यालगतची नगरपंचायतीची ओपनस्पेस जागा संस्थेकडे देखरेख, सौंदर्यीकरण व वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान या संदर्भात ठराव मंजूर होऊन चार वर्षे उलटूनही नगरपंचायतीकडून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या या सभागृहात समाजातील लग्न समारंभ, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत असले तरी अधिकृत व्यवस्थापन नसल्याने काही अडचणी येत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात मनुद केले आहे.संस्थेने नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभागृह व त्यालगतची खुली जागा संस्थेकडे दिल्यास समाजातील विविध कार्यक्रम नियोजनबद्ध आणि सुरळीत पद्धतीने घेता येतील. मात्र ठराव असूनही कार्यवाही होत नसल्याने समाजातील भावना दुखावल्या जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याबाबत नगरपंचायतीने तातडीने निर्णय घेऊन सभागृह व खुली जागा संस्थेकडे हस्तांतरित करावी,अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे मुस्लिम बांधवांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात नगरसेवक परवेज सुरैया यांच्या नेतृत्वाखाली शेख अजगर, सय्यद मिराजी, शेख जब्बार शेख युसूफ, शेख शफीउल्ला शेख दौलत आदींची उपस्थिती होती.
