१० महिन्यांनंतर उघडकीस आला थरारक खून पत्नी,मुलानेच केला पतीचा खून; सहस्रकुंडाजवळ मृतदेहाची विल्हेवाट

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड :-

बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दहा महिन्यांपूर्वी आढळलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना यश आले आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी व मुलानेच खून केल्याचे निष्पन्न होऊन दोघांना अटक करण्यात आली आहे.

९ जानेवारी २०२५ रोजी शिवराम पेठा, पेंगंगा नदीपात्रातील सहस्रकुंड धबधब्याजवळ ३० ते ४० वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृताच्या पायांना पिवळ्या रंगाच्या फाटलेल्या फरशीमध्ये बांधलेले होते. याप्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०३ व २३८ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने तपासात मोठ्या अडचणी येत होत्या.अखेर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला.पथकाने सखोल तपास करत सुमारे ५० किलोमीटर परिसरात माहिती संकलन केले. त्यात मृत व्यक्तीची ओळख मारोती गंगाराम डुकरे (रा. जलधरा, पो. इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड) अशी पटली.

पुढील चौकशीत संशय बळावल्याने पोलिसांनी मृतकाची पत्नी मारोती डुकरे (वय ५५) व मुलगा प्रवीण मारोती डुकरे (वय २५) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी कौटुंबिक वादातून मारोती डुकरे यांचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर मृतदेह पिवळ्या फरशीमध्ये बांधून सहस्रकुंड धबधब्याजवळ फेकून दिल्याचे त्यांनी मान्य केले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास बिटरगाव पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या