शाळेतील गीतावरचा वाद हा बदनामीचा कट; कोणताही धार्मिक हेतू नाही शिक्षण सभापती रसूल पटेल यांची पत्रकार परिषदेमधून स्पष्टोक्ती 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड :-

येथील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील एका गीतावरून उभा राहिलेला वाद हा निव्वळ गैरसमजातून आणि राजकीय हेतूने पसरविण्यात आला असल्याचा ठाम आरोप शिक्षण सभापती रसूल पटेल यांनी केला आहे. या प्रकरणामागे कोणताही धार्मिक किंवा देशविरोधी उद्देश नसून, शाळा व अल्पसंख्याक समाजाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राज्यातील शोकदिवसामुळे काही कार्यक्रम पुढे ढकलून ते ३१ जानेवारी रोजी पार पडले. यावेळी सादर करण्यात आलेले गीत हे १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असून, त्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, त्याग व ब्रिटिशांविरोधातील संघर्षाची जाणीव निर्माण करणे हाच होता, असे पटेल यांनी सांगितले.

सदर गीताचा १९६५ च्या भारत–पाक युद्धाशी कोणताही संबंध नाही, तसेच ते कोणत्याही प्रतिबंधित यादीतही नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिम उलमा, पंडित व विविध समाजघटकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरोधात दिलेल्या लढ्याचे ऐतिहासिक वर्णन या गीतातून मांडले असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

“या गीतामधून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश देण्यात आला असून, कोणत्याही धर्माचा प्रचार किंवा राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शाळेत सर्व धर्मांचा समान सन्मान राखला जातो,” असेही पटेल यांनी नमूद केले.शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या खुलाशानुसार, ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असून त्यात कोणतेही तथ्य नाही. केवळ अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्यासाठी हा वाद मुद्दाम उकरून काढण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

 

⬛दरम्यान, आमच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून, त्याबाबत आम्ही गप्प बसणार नाही.खोटी तक्रार करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात लवकरच न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशाराही शिक्षण सभापती रसूल पटेल यांनी दिला.

समाजात गैरसमज पसरवू नयेत आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण शांत ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी साजीद जहागीरदार स्थायी समिती सदस्य, प्रकाश शिकारे बांधकाम सभापती, विरेंद्र खंदारे आरोग्य सभापती, अ. गणी शहा नगरसेवक, वासीफ पठाण, सै. सिकंदर, सिद्धू जगताप व बाबुभाई हिना यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या