नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याने शेतकरी हतबल, महागावात ६५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव :

शेतीवर जगणारा शेतकरी आज स्वतःच्या जगण्यासाठी झगडताना दिसत आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि घरखर्चाचा ताण सहन न झाल्याने शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्याची हृदयद्रावक घटना महागाव तालुक्यात घडली आहे. विजय अवधूत कदम (वय ६५, रा. आमनी खुर्द) यांनी पिपरी शिवारातील जंगल परिसरात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

विजय कदम हे कष्टाळू आणि शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून ओळखले जात होते. आमनी खुर्द शिवारात त्यांची चार एकर शेती होती. मात्र मागील काही वर्षांपासून पावसाअभावी आणि नापिकीमुळे शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे उत्पन्न घटले आणि आर्थिक अडचणी वाढत गेल्या.त्यांच्यावर बँकेचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जफेडीचा तगादा, घरखर्च आणि शेतीसाठी लागणारा वाढता खर्च यामुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती आहे.

मृत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे. घराचा आधारवड गमावल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद महागाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन सवना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

—————————————————————————————ही,घटना पुन्हा एकदा नापिकी आणि कर्जामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकत असून, अशा जगाच्या पोशिंद्यांना दिलासा देणारी ठोस मदत व्यवस्था कधी उभी राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या