भुकेचा केंद्रबिंदू’ला मानाचा चौथा साहित्यिक पुरस्कार जाहीर  अमरावतीच्या अखिल भारतीय एल्गार ग़ज़ल संमेलनात होणार गौरव

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव:- 

 

मराठी ग़ज़ल परंपरेत सामाजिक वास्तवाची ठसठशीत नोंद उमटविणाऱ्या महागाव येथील सुप्रसिद्ध ग़ज़लकार गजानन वाघमारे यांच्या ‘भुकेचा केंद्रबिंदू’ या ग़ज़ल संग्रहास आणखी एका मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या संग्रहास स्व. व्यंकटराव देशमुख स्मृती ग़ज़ल गुंफन पुरस्कार जाहीर झाला असून, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावती येथे होणाऱ्या अखिल भारतीय एल्गार ग़ज़ल संमेलनात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

मंगेश देशमुख व सौ. क्षिप्रा डाखोडे देशमुख यांच्या सौजन्याने दिला जाणारा हा पुरस्कार ५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा आहे. अखिल भारतीय स्तरावर आयोजित एल्गार ग़ज़ल संमेलनात हा पुरस्कार दिला जात असल्याने या सन्मानाचे साहित्यिक महत्त्व अधिकच अधोरेखित होते.‘भुकेचा केंद्रबिंदू’ या संग्रहाने अल्पावधीतच मराठी साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी या संग्रहास शेगाव बुद्रुक येथील कवितेचे घर संस्थेचा बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय ग़ज़ल पुरस्कार, हिमायतनगर येथील संवेदना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग़ज़ल संग्रह पुरस्कार, तसेच नागपूर येथील साहित्य विहार संस्थेचा सर्वोत्कृष्ट ग़ज़ल संग्रह पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता या संग्रहावर चौथ्या राज्यस्तरीय पुरस्काराची मोहर उमटत आहे.

या संग्रहात एकूण शंभर ग़ज़लांचा समावेश असून, भूक, बेरोजगारी, गरीबी, जातीय विद्वेष, धार्मिक कट्टरता, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या यांसारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांची गहन व संवेदनशील मांडणी या ग़ज़लांमधून प्रत्ययास येते. सामाजिक वास्तवाचे विदारक दर्शन घडवितानाच प्रेम, विरह आणि मानवी भावनांचे सूक्ष्म, तरल पदरही या ग़ज़लांमधून उलगडतात. त्यामुळे या रचनांमध्ये विचारांची धार जशी आहे, तशीच भावनांची ओलही जाणवते.दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी महागाव येथे ज्येष्ठ ग़ज़लनवाज पं. भीमराव पांचाळे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन झाले होते. अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत चार राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले जाणे, ही मराठी ग़ज़ल क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रेरणादायी घटना मानली जात आहे.

साहित्यिक व सांस्कृतिकदृष्ट्या तुलनेने मागास समजल्या जाणाऱ्या महागाव तालुक्यासाठी हा सन्मान अभिमानाचा क्षण ठरत असून, गजानन वाघमारे यांच्या यशामुळे या परिसरातील नवोदित साहित्यिकांना नवी दिशा व आत्मविश्वास मिळत आहे.सामाजिक वास्तवाचे भान राखून लिहिलेली ग़ज़लही व्यापक वाचकप्रियता मिळवू शकते, हे ‘भुकेचा केंद्रबिंदू’ने पुन्हा एकदा ठामपणे सिद्धकेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या