आंबोड्यात भक्तीचा महापर्व; श्री गजानन महाराजांच्या १४९ व्या प्रकट दिनानिमित्त नऊ दिवसांचा भव्य सप्ताह व यात्रा महोत्सव

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
संत परंपरेच्या पावन भूमीत असलेल्या आंबोडा (सं) येथे श्री गजानन महाराज शेगाव यांच्या १४९ व्या प्रकट दिनानिमित्त भव्य धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गजानन महाराज संस्थान, आंबोडा (सं) (संस्था नोंदणी क्र. ५५२), ता. महागाव, जि. यवतमाळ यांच्या वतीने दि. १ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, यात्रा महोत्सव व कलशारोहण असे विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नऊ चालणाऱ्या या महोत्सवात अखंड नामस्मरण, प्रवचन, कीर्तन व धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. अतुल दत्तराव पतंगराव (रा. आंबोडा) यांच्या सौजन्याने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, ह.भ.प. तानाजी बापू (निजधाम आश्रम, मुडाणा) हे आपल्या मधुर व ओघवत्या वाणीने कथा कथन करणार आहेत.
दि. २ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी सकाळी श्री गजानन महाराजांचा अभिषेक डॉ. राम दिलीप बेलकगमवार (महागाव), डॉ. श्रीकांत अरुणराव देशमुख (खडका), बाळू नारायण वाकोडे (महागाव), शिवराज भगवानराव ठाकरे (उटी) व मनोज बबनराव तगडपल्लेवार (महागाव) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी संतोषी माता मंदिर व हनुमान मंदिर येथे होणारा कलशारोहण कार्यक्रम परमपूज्य सद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज व ह.भ.प. तानाजी बापू यांच्या पावन हस्ते पार पडणार आहे.
श्रींच्या प्रकट दिनानिमित्त होणारा विशेष अभिषेक नितीनजी भुतडा (जिल्हा समन्वयक, भाजप, यवतमाळ), मा. आमदार किसनराव वानखेडे (उमरखेड–महागाव), माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवरावजी ससाने, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड (उमरखेड) व श्रावण जाधव साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा भजन, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, दुपारी श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ तर रात्री हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. रात्रीच्या हरिकीर्तनात अनुक्रमे ह.भ.प. महाराज पवार (लोहा, जि. नांदेड), ऋषिकेश महाराज (शेंबाळपिंपरी), ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के (लिंबी, ता. पुसद), ह.भ.प. प्रणव महाराज हातलेकर (हातला), ह.भ.प. अरविंद महाराज मोरे (नांदेड), ह.भ.प. भीमराव महाराज सूर्यवंशी (पुटाणकर), ह.भ.प. रुपालीताई पाटील (पवनेरकर) यांची कीर्तने होणार असून, दि. ९ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. तानाजी बापू यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री गजानन महाराजांच्या पालखीची भव्य शोभायात्रा निघणार असून, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन व त्यानंतर श्रींच्या प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे श्री गजानन महाराज संस्थान, आंबोडा (सं) हे यंदा आपले ५० वे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या वतीने धार्मिक उपक्रमांसोबतच पूरग्रस्त व आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत विविध मदतकार्यही सातत्याने करण्यात येत आहे.
या सर्व भक्तिमय कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गजानन महाराज यात्रा कमिटी व गावकरी मंडळी, आंबोडा (सं) यांच्या वतीने करण्यात आले असून, अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, सचिव व विश्वस्त मंडळ यांनी ही माहिती दिली आहे.
