प्रजासत्ताक दिनी महागाव तहसील कार्यालयाचा सामाजिक संदेश सांस्कृतिक कार्यक्रमांसह बालविवाह प्रतिबंध व तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव तहसील कार्यालयाच्या वतीने २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून देशभक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीचा ठोस संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस निवासी नायब तहसीलदार विठ्ठल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाळांचे शिक्षक-शिक्षिका, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, नृत्य व नाट्यप्रयोगांनी कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले बालविवाह प्रतिबंधाची शपथ आणि तंबाखूमुक्त समाजनिर्मितीची शपथ.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी बालविवाहाला कायमचा आळा घालण्याचा तसेच तंबाखूमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला. लहान वयात होणाऱ्या विवाहामुळे होणारे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, पुरवठा अधिकारी श्री कोल्हे,नायब तहसीलदार गजानन पराते यांची उपस्थिती होती.दरम्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेल्या या उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.
