अवैध दारू विक्रीमुळे महागांवची शांतता धोक्यात; स्थानिक पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाची संशयास्पद भूमिका!

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागांव :-
महागांव शहरात अवैध अतिक्रमण करून सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत अनिस गफ्फार सुरैय्या यांनी दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालय,महागांव येथे मुख्याधिकारी यांना सदर अतिक्रमण तात्काळ काढण्या संदर्भात निवेदन सादर केले.
शहरातील अठवडी बाजाराच्या मुख्य रस्त्यालगत एका दारू विक्रेत्याने बेकायदेशीर अतिक्रमण करून अवैध दारू विक्री सुरू केली आहे.हा रस्ता अंत्ययात्रा,स्मशानभूमी व मुस्लिम कब्रिस्तान तसेच कमळेश्वर मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या महिला,ज्येष्ठ नागरिक व भाविकांचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.अशा संवेदनशील ठिकाणी अवैध दारू विक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
केवळ अठवडी बाजारच नव्हे,तर संपूर्ण शहरासह तालुका दंडाधिकारी कार्यालया लगत मागील अनेक महिन्यांपासून दिवसा ढवळ्या अवैध्य देशी दारू विक्री होत आहे.तसेच यासह शहरातील गल्लोबोळीत सुद्धा देशी दारूची मोठ्याप्रमाणात अवैध विक्री खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र या प्रकारांकडे उत्पादन शुल्क विभाग, आणि स्थानिक पोलिस जमादार कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कारवाई का ? होत नाही यामागे नेमके कारण काय? असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निव्वळ अर्थकारणासाठी शहरातील नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची तीव्र जनभावना निर्माण झाली असून, प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होत आहे.अवैध दारू विक्रीमुळे महिलांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.
नगरपंचायत प्रशासनाने सदर अवैध अतिक्रमण तात्काळ हटवून दारू विक्री बंद करण्याची कार्यवाही करावी,तसेच उत्पादन शुल्क विभागाने शहरातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी,अशी ठाम मागणी नागरिकांमधून होत आहे.प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर नागरिकांकडून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
