मृत्यूचा महामार्ग कधी थांबणार ? हिवरा (संगम) येथे पुन्हा अपघातात तरुणाचा बळी,राष्ट्रीय महामार्ग विभाग अजून किती प्राणांची आहुती घेणार ?

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणामुळे हिवरा (संगम) येथे पुन्हा एक निष्पाप जीव गमावला गेला आहे. ट्रक व मोटरसायकलच्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.महागाव तालुक्यातील हिवरा संगमजवळ श्री.एकविरा देवी मंदिर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग हा भाग दिवसेंदिवस अपघातांचा केंद्रबिंदू ठरत असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे प्राण सतत धोक्यात आले आहेत.
नांदेडहून नागपूरकडे जाणारा मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच ०९ ई.एल ४३९२ आणि समोरून येणारी दुचाकी क्रमांक एम एच ३८ वाय एच ३७४८ यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात करण कुमार पुंजाजी भागवत वय ३० वर्षे, राहणार बेलथर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचा जागीच मृत्यू झाला. करण कुमार हे हिंगणघाट येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावून आपल्या गावाकडे जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अपघातासाठी जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.सदर अपघातस्थळी स्टॉप फलक, वळण सूचक फलक, गतीमर्यादा दर्शविणारे सूचना फलक तसेच गतिरोधक यांचा पूर्णपणे अभाव आहे.परिणामी या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असून ही अपघातांची मालिका काही केल्या थांबत नाही.आतापर्यंत या महामार्गावर अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत,तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आले आहे.तरीही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही,ही बाब अत्यंत संतापजनक आहे.
प्रत्येक अपघातानंतर पोलिस पंचनामा करतात, चौकशी होते,अहवाल तयार होतात,फाईल्स पुढे सरकतात; मात्र अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कामे मात्र केली जात नाहीत.हा महामार्ग विकासासाठी आहे की सामान्य माणसांच्या मृत्यूसाठी,असा प्रश्न आता संतप्त नागरिक विचारू लागले आहेत.आणखी किती तरुणांचे प्राण गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा होणार,हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.
हिवरा (संगम) येथील अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ स्टॉप फलक, वळण सूचक फलक, गतीमर्यादा दर्शविणारे सूचना फलक, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक तसेच रात्रीसाठी योग्य प्रकाश व्यवस्था करण्यात यावी,अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अन्यथा महामार्ग प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता तरी जबाबदारी स्वीकारून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,अन्यथा हा रस्ता ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून नव्हे तर ‘मृत्यूचा महामार्ग’ म्हणूनच ओळखला जाईल,अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
