कै. वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्राजवळ देशी दारू दुकानाला तीव्र विरोध; महिलांचा आक्रोश,साखळी उपोषणाचा इशारा ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव : 

महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्रालगत असलेल्या मुख्य बाजारपेठेत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या देशी दारू दुकानास नागरिक व महिलांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. शुक्रवार,दिनांक २३ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या दुकानामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्य बाजारपेठेतील बेलपत्रे कॉम्प्लेक्समधील तळघरातील गाळ्यात शुभम बाबुलाल जयस्वाल यांच्या मालकीचे देशी दारू दुकान (CL-3 क. 79) सुरू करण्यात करण्यात आले होते.या संदर्भात काल काही स्थानिक पुढारी आणि नगरसेवकांनी या प्रकरणात विरोध दर्शवला असून हा परिसर अत्यंत वर्दळीचा, महिलांची सतत ये-जा असलेला व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. अशा ठिकाणी देशी दारू दुकान सुरू केल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कै. वसंतरावजी नाईक हे थोर समाजसुधारक व राज्याचे माजी मुख्यमंत्री असताना, त्यांच्या तैलचित्राच्या अगदी शेजारी दारू दुकान सुरू करणे हे त्यांच्या स्मृतीला आणि सामाजिक मूल्यांना न शोभणारे असल्याची तीव्र भावना महिलांनी व नागरिकांनी व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित देशी दारू दुकान सुरू करू नये, तसेच यापूर्वी सुरू असलेला वाईन बारही त्वरित बंद करण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गरज भासल्यास महिलांचे व नागरिकांचे मतदान घेऊन दोन्ही दारू दुकानांवर टाळे लावावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.

प्रशासनाने जनभावनेचा आदर न राखल्यास येत्या २७ जानेवारी २०२६ रोजी साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या