महसूल यंत्रणेच्या निष्क्रियतेचा बळी ! अवैध रेती वाहतुकीने प्राण घेतला, एक ठार, एक मृत्यूशी झुंजतोय

⚫ लोक वेद न्यूज नेटवर्क 

महागाव :- 

सवना–महागाव रोडवरील गुंज येथील भीम नगरजवळ रात्री सुमारे ११ वाजता रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर पुसद येथील खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू असल्याची माहिती आहे.या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर ट्रॅक्टर महागाव कडून गुंजच्या दिशेने अवैधरित्या रेती वाहतूक करत होते.महसूल प्रशासनाची कारवाई कधी होईल या भीतीने अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली रात्रीच्या अंधारात सुसाट वेगाने धावत आहेत. हा वेग म्हणजे केवळ रेतीचा नाही, तर मृत्यूकडे नेणारा वेग आहे. अशा बेफिकीर वाहतुकीमुळे अपघातांच्या घटना सातत्याने वाढत असून त्याला आळा घालण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे.

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासातून “वाळूचा अवैध व्यवसाय” हा काहींसाठी सोपा मार्ग झाला आहे. मात्र या काळ्या धंद्याची किंमत निष्पाप चालक, मजूर आणि त्यांच्या कुटुंबांना आपले प्राण देऊन चुकवावी लागत आहे. अनेक घरांचा कर्ता पुरुष, कुटुंबाचा एकमेव आधार असलेले चालक आणि मजूर या जीवघेण्या व्यवसायात अक्षरशः बळी पडत आहेत.

अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण का नाही? रात्री उघडपणे सुसाट धावणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली महसूल प्रशासनाला दिसत नाहीत की मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे? तपास पथके, नाकाबंदी, जप्ती आणि कठोर कारवाई हे सर्व फक्त कागदापुरतेच मर्यादित आहेत का ? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

या अपघाताने पुन्हा एकदा महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश केला आहे. अपघात झाल्यावर नेहमीप्रमाणे हळहळ व्यक्त करून विषय संपवण्याची वेळ आता गेलेली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस उत्तरदायित्व निश्चित करून अवैध रेती वाहतुकीवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या आणखी किती कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतील, याची जबाबदारी नेमकी कोण घेणार ? असे अनेक प्रश्न सध्या तरी निरुत्तरित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या