महागावचे तहसीलदार अभय मस्के यांच्या हस्ते मनोज सुरोशे यांना ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव –
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडत वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेले राज्य दैनिक बाळकडू विदर्भ प्रमुख तसेच दैनिक युवक आधारचे तालुका प्रतिनिधी-विदर्भ प्रमुख मनोज सुरोशे यांना ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात महागाव येथील तहसीलदार अभय मस्के यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.
मनोज सुरोशे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. केवळ बातम्या देण्यापुरते न थांबता, समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आपल्या लेखणीतून निर्भीड लढा दिला आहे. त्यांच्या अनेक बातम्यांची प्रशासनाने दखल घेतली असून, त्यातून अनेक पीडितांना प्रत्यक्ष न्याय मिळाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यांच्या सामाजिक जाणिवेची आणि निर्भीड पत्रकारितेची दखल घेत महागाव टाइम्स तर्फे त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी तहसीलदार अभय मस्के यांनी मनोज सुरोशे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत समाजहितासाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनोज सुरोशे असल्याचे प्रतिपादन केले.या पुरस्काराबद्दल संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्हा परिसरातून मनोज सुरोशे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
