पुसदच्या यशवंत रंग मंदिर मैदानावर पत्रकार क्रिकेट चषक २०२६ ची रंगत,१६ संघांचा थरार

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
पुसद :-
पुसद शहरात आजपासून दि. ८ जानेवारी रोज गुरुवारी पत्रकार क्रिकेट चषक २०२६ या बहुप्रतिक्षित स्पर्धेला जल्लोषात सुरुवात होत आहे.सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा दि. १३ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून यात एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत.सर्व सामने यशवंत रंग मंदिर येथे खेळविले जाणार आहेत.
या,क्रिकेट महोत्सवात एम. आर. इलेव्हन, सरपंच इलेव्हन, घरकुल अभियंता, पोलिस इलेव्हन, डॉक्टर इलेव्हन, महावितरण इलेव्हन, ॲडव्होकेट इलेव्हन,महसूल इलेव्हन, एन.पी.आर.आरोग्य,अभियंता इलेव्हन, फॉरेस्ट इलेव्हन, कृषी विभाग, जि.प. इलेव्हन, पत्रकार इलेव्हन,आरोग्य सेवक आणि पाटबंधारे विभाग इलेव्हन अशा १६ संघांचा सहभाग आहे.
दि. ८ ते १३ जानेवारीदरम्यान दररोज सामने रंगणार असून प्रत्येक सामना प्रत्येकी ८ षटकांचा असेल.स्पर्धेचा अंतिम सामना १० षटकांचा खेळविण्यात येणार आहे.आज सकाळी ९ वाजता उद्घाटन सामना मागील वर्षीचा विजेता अभियंता इलेव्हन आणि उपविजेता डॉक्टर्स इलेव्हन यांच्यात होत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे आहेत. मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मोहम्मद नदीम उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. मोहिनी नाईक व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व. पै. बाबाराव लेवेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रमेश चव्हाण पाटील यांच्या वतीने प्रथम,द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या संघांना आकर्षक ट्रॉफी प्रदान केल्या जाणार आहेत. क्रिकेटप्रेमींनी या क्रीडा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार क्रिकेट क्लब, पुसद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
